'सैराट'ची पहिल्या ११ दिवसांत विक्रमी ४१ कोटी कमाई! मराठी बॉक्स ऑफिसवर ही 'त्सुनामीच' आली आहे,नाही का?
'नागराज मंजुळे' बस्स हे नावच पुरेसं आहे!
मराठी मातीतील माणूस/दिग्दर्शक....अस्सल ग्रामीण कथानक....ग्रामीण नवखे चेहरे....आगळीवेगळी प्रेमकहाणी....ग्रामीण भागातील चित्रण....अजय-अतुल यांची गाणी....झी स्टुडिओ सारखा मोठा प्लॅटफॉर्म व निखील सानेंसारखा दिग्गज निर्माता....आटपाट प्रॉडक्टन....आणि सोशल मीडियावर लोकांचे सुरवातीपासूनच मिळत असलेले भरभरून प्रेम....यासह बऱ्याच बाबी एकाच वेळी जुळून आल्याने 'सैराट' ची मराठी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः 'त्सुनामी' आहे आणि ती आणखी काही दिवस नक्कीच राहणार आहे हि काळ्या दगडावरची रेघ आहे हे नक्की, मराठी चित्रपटाला मिळणारी
हि आल्हाददायक सकारात्मकता पाहून प्रत्येक
मराठीप्रेमींना मनापासून बरं वाटत असेल एवढं नक्की!
२९ एप्रिल २०१६ हा दिवस एकदाचा उजाडला आणि प्रचंड उत्सुकता असणारा
'सैराट' महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.खरंतर सोलापूर जिल्ह्यातील जेऊर सारख्या
खेडेगावात राहणाऱ्या नागराज मंजुळे यांनी
सैराटसाठी बर्लिन महोत्सवापर्यंत मारलेली मजल,
सैराटमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अकलूजच्या रिंकू राजगुरुला ६३व्या राष्ट्रीय फिल्म
पुरस्कार सोहळ्यात मिळालेला 'विशेष आकर्षण' पुरस्कार,नागराज मंजुळे यांच्या यापूर्वीच्याही चित्रपटातील कलाकारांना मिळालेले राष्ट्रीय
पुरस्कार सुरज पवार(पिस्तुल्या), समाधान अवघडे(फँड्री) यामुळे नागराज मंजुळे यांचा मराठी चित्रपट आणि राष्ट्रीय पुरस्कार हे जणू समीकरणच झाले आहे असे म्हटल्यास वागवं ठरू नये!
'सैराट' म्हणजे 'बेभान',आणि हाच सैराट चित्रपट महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहात
अक्षरश: धुमाकूळ घालत आहे,मराठी चित्रपटाचा आजवरचा इतिहास पाहता सिनेमागृह
मालकांनी सैराट फारसा चालणार नाही असे समजून काहींनी पहिल्या आठवड्यात सिनेमाचे दोनच खेळ,तर काहींनी तीनच खेळ ठेवले होते.क्वचितच ठिकाणी चार खेळ होते!
पण प्रत्यक्ष लोकांचा तुफानी प्रतिसाद पाहून
दुसऱ्या आठवड्यात राज्यात चाळीस टक्के खेळ वाढवले गेले(काय करणार सिनेमा गृहमालक तरी ? लोकं इतर चित्रपटाची तिकिटेच घेत नव्हती!)
सगळीकडे सैराटला तुफानी प्रतिसाद मिळू लागला गावागावातील,खेडयापाड्यातील तसेच कधीही
सिनेमागृहाचे तोंड न पाहणारी मंडळीही सैराट बघायला सिनेमागृहात गर्दी करू लागली.
आगाऊ नोंदणी(advance booking) प्रचंड वाढली, चार-पाच-सहा दिवसाचे वेटिंग पडू लागले तर काही सिनेमागृहांना यापूर्वी असा तुफानी अंदाज न आल्याने किंवा तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन बुकिंग व्यवस्था केली नव्हती अशा ठिकाणी त्या-त्या दिवशी दिवसभराच्या खेळांची तिकिटे मिळत असल्याने तिकीटविक्री सुरु होताच अवघ्या दोन तासात सर्व तिकिटे खपून हाऊसफुल असे फलक झळकू लागले! एखाद्या मराठी चित्रपटाला एवढी तुफानी गर्दी,एवढं प्रेम सगळं काही अजब व स्वप्नवत असेच होते,मराठी सिनेसृष्टीला हि मोठा दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल नाही का?
आता थोडं सैराट चित्रपटात घुसू, नागराज मंजुळे हे व्यक्तिमत्व सोलापूरच्या मातीतले, ग्रामीण भागात स्वतः राहिलेले असल्याने ग्रामीण भागाबद्दल असणारी नागराज यांची नाळ यापूर्वीच्या दोन चित्रपटातील कथानकात आपण पाहिलेलेच आहे.सैराटमध्येही त्यांनी आर्चि,परश्या, बाळ्या,सल्या,मंग्या अशी ग्रामीण बोलीभाषेची पात्रे निवडली.
सैराटमध्ये मुख्य नायिकेची भूमिका करणाऱ्या अकलूजच्या रिंकू राजगुरू(खरं नाव प्रेरणा राजगुरू) आणि परश्याची भूमिका साकारणारा
पुणेकर पण सध्या सोलापूरस्थित आकाश ठोसर हि
नवी अर्थात नॉन ऍक्टर जोडी निवडली पण उभ्या महाराष्ट्राने या जोडीला भरभरून प्रेम देत सुपरस्टार केले याचे पूर्ण श्रेय जाते अर्थातच नागराज मंजुळे यांच्या choice of Humourला! या भूमिकेस अनुरूप असे कलाकार त्यांनी निवडले,रिंकू-आकाश यांनीही मिळालेल्या संधीचे सोने करत आर्ची-परश्या
साकारताना या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आणि तो अभिनय लोकांना खूप भावला आहे हे आपण पाहतोच आहे.तीन जिवाभावाचे मित्र परश्या(आकाश ठोसर),लंगडा बाळ्या/प्रदीप(तानाजी गलगुंडे) आणि सल्या(अरबाज शेख) या तिघांची मैत्री अफलातून दाखवलीय! प्रदीप व सल्याने जबरदस्त अभिनय करून
मोठी वाहवा मिळवलीय हे दोघेही सोलापूरचेच.
आर्चीची मैत्रीण साकारणारी 'आनी' (अनुजा मूळे) हिनेसुद्धा सुंदर अभिनय केला आहे!
फँड्रीत पिऱ्याची भूमिका साकारणारा व पिस्तुल्या
या लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुरज पवार याने इथेही उत्तम अभिनय करत 'प्रिन्स' च्या भूमिकेला पूर्ण न्याय दिलाय.तात्यांची भूमिका साकारणारे सुरेश विश्वकर्मा(आर्चीचे वडील) यांनी तर चित्रपटात सुरवातीलाच छाप सोडलीय
'कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे हे समद्या तालुक्याला माहितीय.....तालुका सांभाळायचा राहू द्या आधी आपल्या बायका सांभाळा म्हणावं असे अस्सल ग्रामीण डायलॉग प्रभावी ठरतात!
थोडक्यात काय ग्रामीण भागात(विशेषतः सोलापूर) जशी बोलीभाषा आहे अगदी १००% जशीच्या तशी चित्रपटातील प्रत्येक डायलॉगमध्ये तुम्हाला दिसेल,हिच सैराटची खासियत आहे.
चित्रपटाची सुरवात व शेवट यात जमीनअस्मानाचा फरक आहे, पहिल्या हाफमध्ये प्रदर्शनापूर्वीच प्रचंड गाजलेली अजय-अतुल यांची गाणी थिएटरमध्येही लोकं डोक्यावर घेतात 'याड लागलं','सैराट झालं जी','झिंग झिंग झिंगाट' या गाण्यांचा सैराटच्या यशात मोठा वाटा आहे हे कुणीही मान्य करेल.'झिंग झिंग झिंगाट'
गाणे लागताच सिनेमागृहात जागेवर उठून, मोकळ्या जागेत,स्टेजवर येऊन लोक अक्षरशः बेभान होऊन नाचताहेत असं होऊ नये म्हणून
काही सिनेमागृहांनी १०-१० सुरक्षारक्षक तैनात केले होते/करताहेत.तर काही ठिकाणी झिंगाट गाणे दोनदा वाजवले जाईल असे फलक थिएटरबाहेर लावून उत्सुक लोकांना अधिकच प्रोत्साहित केलेय, सिनेसृष्टीच्या इतिहासात हे प्रथमच घडतेय हि जमेची बाजू!
सैराटमधील दाखवण्यात आलेली गावे अजिबात काल्पनिक नाहीत जसे बिटरगाव,जेऊर,करमाळा,वाफेगाव इ. हि गावे प्रत्यक्षात सोलापूर जिल्ह्यात आहेत.शिवाय बहुसंख्य कलाकार
(जवळपास सगळेच) सोलापुरी असल्याने आणि
चित्रपट स्थानिक बोलीभाषेत बनवल्याने कलाकारांना डायलॉग पाठ करायचीही आवश्यकता भासली नाही हे विशेष! सैराट पाहताना ग्रामीण जनतेला(विशेषतः प.महाराष्ट्र) दाखवण्यात आलेले गाव आपलेच आहे असा भास होऊन जाईल इतक्या नैसर्गिक घडामोडी
दाखवण्यात आल्या आहेत. सैराटची सुरुवातच क्रिकेट टुर्नामेंटने होते त्यात कॉमेंट्री,खेळातील चिडाचीडी, अचानक मैदानात एका आजीचे येणे व आपल्या मुलाला मारत घेऊन जाणे,'मुडद्या मेल्या म्हशी काय तुझा बाप राखायचा व्हय रं? ....दोन लेकरांचे बाप झाले तरी लाज नसल्यासारखे खेळतात...बिली बावंडींग म्हणे बिली बावंडिंग!
अशा स्वरूपाचे त्या आजीचे डायलॉग फारच मजेशीर वाटतात,तसं पाहिलं तर असे प्रकार
ग्रामीण भागात सर्रास घडत असतात,दुसऱ्यांच्या विहिरीवर पोहायला जाणे आपल्याला कुणीतरी बाहेर हाकलून काढणे,मासे पकडायला तळ्यात/नदीला जाणे,छुपे प्रेम करणाऱ्यांनी एकमेकांना चिठ्ठ्या पाठवणे त्यासाठी लहानग्यांना खाऊचे आमिष दाखवून त्यांची मदत घेणे,कॉलेजच्या कट्ट्यावर बसून मुलींना एकटक पाहणे अशा खरोखर घडणाऱ्या अनेक आनंदी-दुःखी बाबी
सैराटमध्ये बोलीभाषेत दाखवल्यामुळे प्रत्येकाला हा चित्रपट आपलासा वाटतोच!
सैराटमधील गाणी किती अफलातून आहेत
हे पुन्हा सांगायची गरज नाहीच.सुरवातीपासून शेवटपर्यंत वापरण्यात आलेले बॅकग्राऊंड संगीत फारच आल्हाददायक आहे.चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत खळखळून हसणारा,शिट्या मारणारा,नाचणारा प्रेक्षक मध्यंतरानंतर मात्र शांत शांत होत जातो आणि शेवटच्या मिनिटाला तर थिएटरमध्ये स्मशान शांतता पसरते,दोन वेगवेगळ्या समाजातील मुलामुली पळून जाऊन आंतरजातीय विवाह करतात ते थेट परराज्यात जाऊन स्थायिक होतात संसार खुप जोरात सुरु असतो पण मुलीचे नातेवाईक(मेहुणा) तिथे पोहोचतात आणि त्या दोघांचा क्रूरपणे खून करतात, थोडक्यात काय आपला समाज तंत्रज्ञानाच्या आजच्या युगातही कुणी आंतरजातीय विवाह केला तर काय करू शकतो याची कैफियतच सैराटमध्ये दाखवून मोठा विचार करायला लावणारा संदेश या चित्रपटातून नागराज मंजुळे यांनी दिला आहे या विषयाला अनेक अंगांनी दाखवल्याबद्दल मंजुळे यांचे विशेष आभारच मानायला हवेत.
मला या चित्रपटात सर्वात जास्त अभिनय आवडला तो त्या लहानग्याचा....आर्चीचे बाळ(शिवम मोरे) किती अफलातून दाखवलेय,यापेक्षा अव्वल दर्जाची लहान बाळाची भूमिका मी कधीच पहिली
नाही,त्या बाळाला हॅट्स ऑफ!
आता सिनेमागृहाबाहेरचं बोलूयात,मी वैयक्तिक माझे होम टाउन अकलूजमध्ये सैराट पाहिला पण त्यासाठी मला आठ दिवस वाट पहावी लागली,कारण चित्रपटाची अभिनेत्री आमच्या अकलूजचीच....मग गावच्या कन्येचा अभिनय पाहायला गर्दी तर होणारच नाही का? गर्दी कसली महागर्दी...अकलूजमध्ये तिकीटबारीवर एवढी गर्दी होती की थिएटर प्रशासनाला पोलिसांची तुकडी मागवावी लागली....एक तासात दिवसभराच्या सर्व खेळांची तिकीट खपू लागली,आणि हि गर्दी मी हा लेख लिहित असताना १२व्या दिवशीही कायम होती,किमान पुढचे १५ दिवस अशी गर्दी नक्कीच असेल...विचार करा एका तासात चारही खेळांची तिकीट तासात खपत असतील आणि हे २-३ आठवडे चालत असेल तर मराठी चित्रपट किती पुढे जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'सैराट'. ६० ₹चे तिकीट ३००,४००,५०० ₹ तर बाल्कनी १००चे तिकीट ५००,७००,₹ ब्लॅक ने देऊन सैराट तरुणाई मी स्वतः डोळ्यांनी पाहिली.एखाद्या मंदिराप्रमाणे मोठमोठ्या रांगा लावून तिकीट काढणारी लोकं, तिकीटबारीवरील तुडुंब गर्दी पाहून पोलीस संरक्षण मागणारे थिएटर प्रशासन,दोन तिकीट ऍडजस्ट करा तुमचं चहापाण्याचं काही असेल तर घ्या असं म्हणणारी लोकंही पाहीली.लोकांच्या भव्य रांगा पाहून
'हे कुठल्या देवाचे देऊळ रे बाबा?' असं निरागसपणे विचारणारी आजीबाई सुद्धा पाहीली.
काही ठिकाणी सैराट चे दोन/तीन खेळ ठेवल्याने थिएटरप्रशासनाला शिव्यांची लाखोळी वाहणारी
तरुणाई पाहिली
अशा अनेक सकारात्मक(अजब सुद्धा) बाबी मला थिएटरबाहेर पहायला मिळाल्या.मला वाटते कोणत्याही
दिग्दर्शकाला असा हा प्रतिसाद म्हणजे 'आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे' असाच अनुभव आहे हे सत्य नाकारता येणार नाही,असो.
सैराटची सेन्सर एच डी प्रिंट प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशीच मुंबईतून(काहीजण म्हणतात पुण्यातून!) लीक झाली ती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरू लागली याचा परिणाम थिएटरवर होईल असे वाटले होते पण तरुणाईने थिएटरलाच पहिली पसंती देत सर्वांचे समज खोटे ठरवले
हि चित्रपट लीक करणाऱ्या विकृतीसाठी मोठी चपराकच म्हणावी लागेल.तर काही मंडळींनी चित्रपट न पाहताच नकारात्मक मजकूर फेसबुक,व्हाट्सअँप वर टाकून संभ्रमाचे वातावरण तयार केले होते पण सैराट प्रेमींनी तेवढ्याच ताकदीने उत्तर देऊन त्यांचे तोंड गप्प केलेय! सैराट हा तरुणाईला बेभान करून सोडणारा त्यातून समाजाची बरबटलेली दाहक वास्तवता व विचार करायला लावणारा जबरदस्त
सिनेमा आहे हा बॉलिवूडकरांनाही भावलाय
कारण अभिनेता अमीर खानने तर सैराटचा शेवट पाहून मी अजून स्वतःला अजून सावरू शकलेलो नाही असे ट्विट केलेय,दिग्दर्शक सुभाष घई,रितेश देशमुख,जेनेलिया,श्रेया घोषाल,अनुराग कश्यप यासह
अनेक दिग्गजांनी सैराटचे ट्विटरवरून कौतुक केलेय.आपले मुख्यमंत्रीही सैराटच्या कालाकृतीवर फारच प्रभावी आहेत त्यांनी टिम सैराटला १० मे रोजी स्वतःच्या निवासस्थानी बोलवून सत्कार करून मनमुराद गप्पा मारल्या.अशा मराठी कलाकृती सतत येऊ लागल्या तर दक्षिण भारतातील तेलगू,तामिळ
कलाकृतीप्रमाणे मराठी चित्रपटही हिंदी वाहिन्यांवरती
झळकतील यात वाद नाही.सैराट
हिंदीसह इतर काही भाषेत डब होणार आहे हे वाचनात आले हि आणखी सकारात्मक बाब.
एका नॉन actor जोडीला तुफानी लोकप्रियता मिळतेय हे सगळं शक्य होतेय ते वन मॅन आर्मी 'नागराज मंजुळे' यांच्यामुळे, आता तर या नव्या कोऱ्या जोडीला जनतेने नायक/नायिका म्हणून ऑलरेडी स्वीकारलेय,आता रिंकू-आकाश जोडी राज्यातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत त्यांना पाहण्यासाठी/सेल्फी काढण्यासाठी लोकांची तुफानी गर्दी होते आहे यावरून त्यांची लोकप्रियता दिसून येते.
सैराटसारखी अफलातून स्टोरी आम्हाला दाखवल्याबद्दल नागराज मंजुळे यांना हॅट्स ऑफ!
शेवटी एवढंच म्हणेन सैराटची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आहेच ६०+ कोटी तरी निश्चित आहेत बॉस,सैराट पाहून आता झिंगाट झालेले सगळेच म्हणताहेत 'सैराट झालं जी!'.
टिम सैराटला माझ्याकडून सैराटमय शुभेच्छा.आपल्या या दर्जेदार मराठी कलाकृतीला दाद देण्यासाठी आपण सर्वांनी सैराट थिएटरमध्येच पाहायला हवा.
धन्यवाद!!
@madanegopal Twitter
gopalmadane@gmail.com
९९६०२७९३१०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा